लग्नाचा आहेर - Wedding Gift - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, December 6, 2019

लग्नाचा आहेर - Wedding Gift


Source Google 

लग्नात आहेर म्हणून आलेल्या वस्तू घरी साठून राहतात आणि कालांतराने त्याच दुसऱ्या कोणाला तरी आहेर म्हणून दिल्या जातात. आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असतो. लग्न ठरल्यानंतर आणि लग्नानंतर आर्थिक नियोजन करणे, आर्थिक नियोजन करण्यास मदत करणे, गुंतवणूक सुरू करून देणे हा आहेर पुढील आयुष्यासाठी खूप मोलाचा ठरेल. आपण आता त्याकडे वळायलाच हवे.
अशोक अलूरकर

हेही वाचा : आजीबाईचा बटवा - बाल अरोग्य
आपण मागील लेखात ऋतूंचे महत्त्व, वैशिष्ट्य पहिले. नुकतेच काम सुरू केलेल्या व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाविषयी समजून घेतले. आज आपण वयाने थोड्या पुढील, म्हणजे नुकतेच लग्न झालेल्या अथवा नजीकच्या काळात लग्न करू इच्छिणाऱ्या व्यक्तींबद्दल समजून घेऊ. नवीन नवीन विवाहाच्या बंधनात अडकलेल्या तरुणांनी आर्थिक बाबींचे व्यवस्थित नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते. नियोजन केल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतात; शिवाय समृद्धी प्राप्त करणे सहज शक्य होते. विवाह सोहळ्याचे नियोजन हे जसे चोखंदळपणे आणि उत्साहाने केले जाते, त्याच उत्साहात विवाहानंतर सुज्ञपणे गुंतवणूक करण्याचे संस्कार करणे फायद्याचे ठरेल. घरात मुलीचे लग्न ठरले, की तिच्या मामाने साडी देण्याची प्रथा आहे. विविध समाजात घरात लग्न असले, की त्या वधूला अथवा वराला विशिष्ट नातेवाइकाने ठरावीक वस्तू भेट देणे, अमुक अमुक विधीच्या वेळी ठरावीक नातेवाइकाने आहेर करणे अशा अनेक प्रथा आपण पाहतो. अशा प्रथा असण्यामागे काही कारणे असतीलच. या शिवाय, एकमेकांत स्नेह वृद्धिंगत होणे, काही नात्यांचे महत्त्व अधोरेखीत करणे, असे अनेक हेतू यामागे असू शकतात. शिवाय व्याहीभोजन हा कार्यक्रम नुसताच मान देण्यासाठी नसतो, तर एकमेकांची ओळख करून घेणे, एकमेकांस समजून घेणे, नात्यातील गोडवा वाढवणे, असे अनेक हेतू या रूढींमधून साध्य होताना दिसतात.
आपल्या भाच्चीचे, पुतण्याचे लग्न आहे म्हटल्यावर बऱ्याचदा अनेक भेटवस्तू दिल्या जातात. त्यातील कित्येक वस्तू या लग्नघरात आधीपासून असतात. अशा भेट म्हणून आलेल्या वस्तू पुढे उपयोगात येत नाहीत, असेही आढळते. पुढे या भेट म्हणून आलेल्या वस्तूच इतरांना आहेर म्हणून दिल्या जातात, हा अनुभवही आपल्याला असतो. एकूण काय, तर असे झाल्यामुळे देणाऱ्या व्यक्तीच्या मनातील हेतू पराभूत होताना दिसतो. आहेर करणाऱ्या व्यक्तीच्या मनात असलेले प्रेम आपण समजू शकतो. त्याने प्रेमाने दिलेल्या गोष्टीचा त्या व्यक्तीलाही उपयोग व्हायला हवा. आपण या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. आपण प्रेमाने आणलेल्या, भेट म्हणून दिलेल्या वस्तूचा फायदा त्या व्यक्तीला झाला, तर त्यामध्ये वेगळे समाधान असते.
लहान मुलांना वाढदिवसाला एखादे रोप देऊन, त्याचे महत्त्व समजाविले जाते किंवा एखादे पुस्तक देऊन वाचनाची गोडी लावली जाते, त्याचप्रमाणे लग्नात आहेर म्हणून गुंतवणूकरुपी भेट दिली, तर त्या दिलेल्या भेटीचा फायदा दीर्घ मुदतीनंतर आयुष्य बदलणारा असू शकतो. शिवाय दुसरा फायदा असा, की जर बऱ्याच लोकांनी अशा प्रकारे भेट दिली, तर अनावश्यक, निरर्थक, वाया जाणाऱ्या वस्तूंऐवजी ही उपयोगी, फलदायी भेट नवदाम्पत्याला आयुष्यात समृद्धी मिळविण्यासाठी नक्कीच मदत करेल. या व्यतिरिक्त दोन फायदे असे, की भेट देणाऱ्या व्यक्तीची आठवण त्या दाम्पत्याला राहील आणि त्या दाम्पत्यालाही गुंतवणुकीचे महत्त्व पटेल. त्यांचा कल गुंतवणूक करण्याकडे असेल. हल्ली लग्नाआधी कौन्सेलिंग केले जाते. त्याच पद्धतीने लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर लगेच आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने अनेक आर्थिक त्रास टळतील; शिवाय आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे सहज शक्य होईल. ही संकल्पना नवीन, अनाकल्पनीय वाटेल; मात्र थोडा विचार केल्यास याच नव्हे तर यामुळे पुढील पिढ्यांचे कल्याण निश्चित होईल, हे पटेल. हल्ली नवरा आणि बायको असे दोघेही काम करताना दिसतात. त्या दोघांच्या कमाईतून बाजूला असलेली गुंतवणूक नगण्य असण्याची शक्यता जास्त असते. साधारणतः असे असण्याचे कारण आर्थिक नियोजनाचा अभाव हे असते. आर्थिक सुबत्ता आणि समृद्धीसाठी योग्य वेळी योग्य पावले उचला आणि अर्थसाक्षर होऊन त्याचे फायदे घ्या. परदेशात फिरायला जायच्या आधी भरपूर तयारी केली जाते, तशीच किंबहुना त्याहून अधिक सुनिश्चित तयारी ही वैवाहिक जीवनाचा आरंभ करण्याआधी करायला हवी. हे प्रत्येक पालकाचे आणि वधू-वराचे कर्तव्य आहे. ते पार पडण्यासाठी त्यातील तज्ज्ञांची आवर्जून मदत घ्यावी आणि पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याकडे पहिले पाऊल टाकावे. पुढील लेखात आपण आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक आयुष्याचे काही पैलू पाहू.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog